नवी दिल्ली - इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी शतकी खेळी करत किवींचा डाव सावरला. पण, या सामन्यात एक असा प्रसंग घडला की जो पाहून इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने चक्क डोक्यावर हात मारुन घेतला.
सामन्याच्या ४९ व्या षटकात विल्यमसन ६२ तर रॉस टेलर ६३ धावांवर खेळत होता. आर्चरने आपल्या एका चेंडूवर विल्यमसनला चकवले. चेंडूचा नीट अंदाज न आल्याने विल्यमसनने फटका खेळला. तो चेंडू थेट जो डेनलीच्या हातात गेला. अतिशय सोपा झेल पकडण्याची संधी त्याच्याकडे होती. पण नेमका तोच झेल त्याने सोडला. झेल खुप सोपा असल्याने झेल सुटेल अशी गोलंदाज आर्चरला अपेक्षा देखील नव्हती. मात्र, डेनलीने सोडलेला सोपा झेल पाहून आर्चरने चक्क कपाळावर हात मारून घेतला.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावाच्या ३७५ धावांच्या उत्तरात इंग्लंडने ४७६ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात २ बाद २४१ धावा करताना सामना अनिर्णीत राखला. न्यूझीलंडने दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी शतकी खेळी करताना किवींचा डाव सावरला. दरम्यान, पंचानी हा सामना प्रतिकूल हवामानामुळे अनिर्णीत ठेवल्याची घोषणा केला.
हेही वाचा - कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची मुसंडी, भारत 'या' स्थानावर
हेही वाचा - IPL2020: विश्व करंडकात 'स्टंप' तोडणाऱ्या वेगवान गोलंदाजाची आयपीएलमधून माघार