वेलिंग्टन - न्यूझीलंड क्रिकेटने (एनझेडसी) या महिन्याच्या अखेरीस होणारा महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाईट यांनी शुक्रवारी याची पुष्टी केली. ते म्हणाले, की पुरुष संघाचे येत्या जून आणि जुलैमध्ये होणारे नेदरलँड्स, स्कॉटलंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज या संघासोबतचे दौरेही अडचणीत आले आहेत.
न्यूझीलंडला विंडीज संघासोबत तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे होते. व्हाईट म्हणाले, पुरुष संघाचा बांगलादेश आणि न्यूझीलंड-अ संघाचा भारत दौरादेखील अवघड आहे. हा दौरा ऑगस्टमध्ये आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जग भयभीत झाले असून क्रीडाविश्वालाही या व्हायरसने पछाडले आहे. या व्हायरसमुळे यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली गेली असून अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहे.