हॅमिल्टन - वेस्ट इंडिजविरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघाने एक डाव आणि १३४ धांवानी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विंडीजच्या जेरमाईन ब्लॅकवुडच्या १०४ धावांच्या खेळीनंतरही वेस्ट इंडिजला पराभवापासून दूर जाता आले नाही. कर्णधार केन विल्यम्सनने ठोकलेल्या दुहेरी शतकामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाला जबर धक्का, स्टार्क टी-२० मालिकेबाहेर
न्यूझीलंडने आपला पहिला डाव ७ बाद ५१९ धावांवर घोषित केला. टॉम लॅथमचे अर्धशतक आणि विल्यम्सनच्या द्विशतकी खेळाच्या जोरावर न्यूझीलंडने धावांचा डोंगर उभा केला. विल्यमसनने ४१२ चेंडूत ३४ चौकार आणि २ षटकारांसह २५१ धावा केल्या. तर लॅथमने ८६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजचा पहिला डाव १३८ धावांत संपुष्टात आला. टीम साऊदी, जेमिन्सन, वॅगनर यांच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचे फलंदाज तग धरु शकले नाहीत. त्यानंतर न्यूझीलंडने विंडीजचा फॉलोऑन दिला. फॉलोऑननंतरही न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी तिखट मारा केला. दुसऱ्या डावातही विंडीजची सुरुवात खराब झाली. ६ बाद ८९ अशी परिस्थिती असताना मधल्या फळीत ब्लॅकवूड आणि जोसेफ यांनी १५५ धावांची भागीदारी केली. ब्लॅकवूडने १०४ तर जोसेफने ८६ धावांची खेळी केली. अखेरीस, पाहुण्यांचा संघ २४७ धावांवर संपुष्टात आला.