सिडनी - ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लायन याने भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेची तुलना अॅशेस मालिकेसोबत केली आहे. भारतीय संघ या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौर्यावर येणार आहे. उभय संघामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.
लायन म्हणाला, "ऑस्ट्रेलियाकडून खेळताना आम्हाला मालिका गमवायची नाही. काही वर्षांपूर्वी भारताने आम्हाला पराभूत केले, म्हणूनचे त्यांनी इथे यावे अशी आमची इच्छा आहे. अॅशेसप्रमाणेच ही मालिकादेखील मोठी आहे. त्यांच्या संघात मोठे खेळाडू आहेत. त्यामुळे ही मालिका उत्तम होईल.''
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उभय संघातील पहिला कसोटी सामन्याला 3 डिसेंबरपासून सुरुवात होईल. हा सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला अॅडलेड येथे दुसरा, 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि 3 जानेवारी 2021 मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ विदेशी खेळपट्टीवर आपला पहिला 'डे-नाईट' कसोटी सामना खेळणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) 3 ते 7 जानेवारी 2021 ला हा सामना रंगणार आहे.