मुंबई - विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-१ ने जिंकेल, असे भाकित इंग्लंड संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी वर्तवले आहे. उभय संघातील मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.
डेली मेलसाठी नासिर हुसेन यांनी ब्लॉग लिहला आहे. त्यात ते म्हणतात की, 'भारतीय संघ माझा फेवरेट आहे. मला वाटत की, भारत चार सामन्याची मालिका २-१ ने जिंकेल. पण इंग्लंडचा संघ आश्चर्याचा धक्का देत विजयी होऊ शकतो.'
दरम्यान, नासिर हुसेन यांच्याआधी इंग्लंडचे माजी क्रिकेटर डेविड लॉयड यांनी देखील भारतीय संघ मालिका जिंकेल असे भाकित वर्तवले आहे. त्यांनी भारतीय संघ ३-० ने किंवा ४-० ने मालिका विजय मिळवेल, असे म्हटलं आहे.
भारत-इंग्लंड मालिकेबाबत माँटी पानेसर काय म्हणाला...
भारत-इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याआधी पानेसर म्हणाला की, 'अजिंक्य रहाणेची फलंदाजी आणि नेतृत्व कौशल्य पाहून मी प्रभावीत झालो आहे. तसेच चेतेश्वर पुजारा प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्यात सक्षम आहे. याशिवाय रविचंद्रन अश्विन दोन्ही बाजूने गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता तर आहेच, यासोबत तो एक चतूर गोलंदाज देखील आहे.'
दरम्यान, उभय संघातील पहिले दोन सामने चेन्नई येथे तर उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथील मैदानावर होणार आहेत.
हेही वाचा - ICC World Test Championship: सोप्या शब्दात जाणून घ्या, कोणता संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार अंतिम सामना
हेही वाचा - IND vs ENG : 'या' तीन खेळाडूंपासून सावध राहा; दिग्गजाचा इंग्लंडला सल्ला