ढाका - बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने कोरोना विरुद्धच्या युद्धात मदत करण्यासाठी त्याच्या बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या बॅटने 2013 मध्ये रहिमने लंकेविरूद्ध द्विशतक ठोकले होते.
रहीमने बांगलादेशी वृत्तपत्राला सांगितले, की मी माझ्या द्विशतक केलेल्या बॅटचा ऑनलाईन लिलाव करणार आहे. या बॅटसाठी जास्तीत जास्त बोली लावण्याची मी सर्वांना विनंती करतो, कारण त्यातून मिळणारे उत्पन्न गरीब लोकांच्या मदतीसाठी खर्च केले जाईल.
बांगलादेशमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. गेल्या आठवड्यात स्टार अष्टपैलू शाकिब अल हसननेही सहकारी खेळाडूंना गरिबांच्या मदतीसाठी त्यांची उपकरणे व जर्सींचा लिलाव करण्याची विनंती केली होती.
यापूर्वी इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वापरलेल्या जर्सीचा लिलाव 65 हजार ब्रिटिश पाउंडमध्ये केला होता.