मुंबई - वानखेडे मैदानावर झालेल्या आयपीएलच्या ५१व्या सामन्यात मनीष पांडेने शेवटच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराच्या बळावर हैदराबादने निर्धारित २० षटकात सामना बरोबरीत आणला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ८ धावा केल्या. ९ धावांचे आव्हान मुंबईने ३ चेंडूत पूर्ण केले आणि ‘प्ले-ऑफ्स’मध्ये आपली जागा निश्चित केली.
सामन्यात आणि सुपर ओव्हरमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. त्याने मूळ सामन्यात ४ षटकात ३१ धावा देत २ बळी घेतले. तसेच सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीपुढे हैदराबादचे फलंदाज ४ चेंडूत ८ धावा करून दोन्ही गडी बाद झाले.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चांगली सुरुवात मिळालेला रोहित शर्मा खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. मोठा फटका खेळताना त्याचा मोहम्मद नबीने झेल टिपला. रोहितने ५ चौकरासह १८ चेंडूत २४ धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवच्या साथीने क्विंटन डी कॉकने मुंबईचा डाव पुढे नेला आणि अर्धशतकी भागीदारी केली. चांगली खेळी करण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव बाद झाला. त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचत २३ धावा केल्या. त्यानंतर एवीन लुईस एका धावेवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्या १ चौकार आणि १ षटकार खेळल्यानंतर १८ धावांवर झेलबाद झाला.
मात्र, सलामीवीर डी कॉकने ४७ चेंडूत आयपीएलचे १० वे अर्धशतक पूर्ण केले. कायरन पोलार्ड १० धावा काढून बाद झाला. क्विंटन डी कॉकने नाबाद ६९ धावा केल्या. यामध्ये ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. खलील अहमदने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.