मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. १८ फेब्रुवारीला स्पर्धेचा लिलाव पार पडणार आहे. मात्र, यापूर्वी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने नागालँडच्या १६ वर्षीय युवा फिरकीपटूला चाचणीसाठी बोलावले आहे. ख्रिवित्सो केन्से असे या गोलंदाजचे नाव असून त्याने यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नागालँड क्रिकेट असोसिएशनचे सचिव युनिलो अनिलो खिंग यांनी सोशल मीडियावर केन्सेबाबत माहिती दिली. खिंग यांनी आपल्या दुसर्या ट्विटमध्ये केन्सेच्या स्पर्धेतील कामगिरीचा व्हिडिओ शेअर केला आहे. केन्सेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ४ सामन्यांत एकूण ७ बळी घेत सर्वांना प्रभावित केले.
हेही वाचा - यंदाची आयपीएल ११ एप्रिलपासून?
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने त्यांचे सर्व महत्त्वाचे खेळाडू कायम ठेवले आहेत. मुंबईने मिशेल मॅक्क्लेनाघन आणि नॅथन कुल्टर नाईल, लसिथ मलिंगा यांसारख्या खेळाडूंना मुक्त केले. मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले असून या संघाने अनेकदा नवीन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा स्तर गाठून देण्यात मदत केली आहे.
मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ७ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर, कायम खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तरे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, सुचित रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान यांचा समावेश आहे.
मुक्त केलेले खेळाडू -
लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेनेघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर नाईल, शेरफन रुदरफोर्ड, प्रिन्स बलवंत रॉय, दिग्विजय देशमुख.