नवी दिल्ली - फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर ४० धावांनी विजय मिळविला. या सामन्यात मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कृणाल आणि हार्दिक यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारित २० षटकांत १६८ धावांपर्यंत मजल मारली. १६९ धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघ ९ बाद १२८ धावा करु शकला. गोलंदाज राहुल चाहर हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला आहे.
दिल्लीच्या सलामीच्या फलंदाजांनी ४९ धावांची सलामी दिली. शिखर धवन ३५ तर पृथ्वी शॉ यांने २० धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने २६ धावांची भर घातली. दिल्लीचा संघ राहुल चाहरच्या गोलंदाजीवर संघर्ष करताना दिसून आला. राहुलने ४ षटकात १९ धावा देत ३ गडी बाद केले. जसप्रीत बुमराह याने १८ धावा देत २ गडी बाद करत राहुलला सुरेख साथ दिली. हार्दिक पंड्या, लसिथ मलिंगा आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.
दिल्लीच्या गोलंदाजांनी अचूक मारा केल्यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा ३०, डी कॉक ३५ , सूर्यकुमार यादव २६ तर कृणाल ३७ आणि हर्दिक ३२ धावा काढल्या. दिल्लीकडून कंगिसो रबाडा याने ३८ धावा देत २ गडी बाद केले. अमित मिश्रा आणि अक्षर पटेल याला प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले.