मुंबई - बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत-वेस्ट इंडीज संघात ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्यातील टी-२० मालिकेत महत्वपूर्ण बदल केले आहेत.
भारत-वेस्ट इंडीज संघामध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना ६ डिसेंबरला नियोजित कार्यक्रमानुसार मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार होता. मात्र या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लाखो अनुयायी मुंबईत येत असतात.
तसेच ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडण्यात आली होती. नुकताच या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे शहरात कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. या दोन्ही कारणाने ६ डिसेंबरच्या सामन्याला पोलीस बंदोबस्त पुरवण्यात मुंबई पोलिसांनी असमर्थता दर्शवली.
बीसीसीआयने यामुळं हा सामना हैदराबाद येथे खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ६ डिसेंबरला दोन्ही संघ हैदराबादच्या मैदानावर समोरासमोर येतील. यानंतर ११ डिसेंबरला दोन्ही संघ आपला अखेरचा टी-२० सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळतील.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी बीसीसीआयच्या विनंतीला होकार कळवल्यानंतर या दौऱ्यात बदल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, या मालिकेतला दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुअनंतपुरम येथे खेळवण्यात येईल.
हेही वाचा - 'हिटमॅन'चा अफलातून झेल..तुम्हीही म्हणाल 'व्हॉट अ कॅच'
हेही वाचा - 'तो' सुपरझेल घेत वृद्धीमान साहा ठरला 'बळीसम्राट'.. माहीच्या विक्रमाशी केली बरोबरी