मुंबई - बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी फॉर्मात नसलेल्या केएल राहुलला डच्चू देण्यात आला. त्यामुळे संघाबाहेर ठेवण्यात आलेल्या राहुलला निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के.प्रसाद यांनी एक सल्ला दिला आहे.
हेही वाचा - महिला हॉकी : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी राणी रामपालकडे टीम इंडियाचे कर्णधारपद
राहुलने लक्ष्मणचा आदर्श घ्यावा असे, प्रसाद यांनी म्हटले आहे. 'संघातून बाहेर ठेवल्याबद्दल आम्ही त्याला कळवले होते. तो चांगला खेळाडू आहे, त्याला खुप संधी मिळाल्या. मात्र, काही सामन्यांत त्याच्याकडून योग्य कामगिरी झाली नाही. जेव्हा लक्ष्मणला कसोटी संघातून वगळण्यात आले, तेव्हा त्याने रणजीच्या एका हंगामात १४०० धावा काढल्या होत्या. या कामगिरीच्या बळावर त्याने संघात दमदार पुनरागमन केले होते. राहुलनेही हेच केले पाहिजे', असे प्रसाद पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले.
या मालिकेसाठी राहुलच्या जागी शुभमन गिल याची निवड करण्यात आली आहे. यामुळे रोहित शर्मा मयांक अग्रवालसोबत डावाची सुरुवात करू शकतो. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध भारत अ संघाकडून दमदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. बीसीसीआयने यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि वृध्दीमान साहा यांना निवडले आहे.
आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि शुभमन गिल.