मुंबई - भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सद्या रांचीमध्ये परिवारासोबत वेळ घालवत आहे. या दरम्यान, धोनी कडकनाथ कोंबड्या पाळणार असल्याचे माहिती समोर आली आहे. त्याने मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडे २ हजार कोंबड्यांची ऑर्डर दिल्याची माहिती मिळत आहे.
फार्महाऊसवर लॉकडाऊनमध्ये सुचली कल्पना
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये धोनी परिवारासह त्याच्या रांचीमधील फार्म हाऊसवर शेती करताना पाहायला मिळाला. तसेच तो ट्रॅक्टर चालवतानाचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. आता धोनीने कडकनाथ कोंबड्या आपल्या फार्म हाऊसवर पाळण्याचा विचार केला आहे.
कडकनाथ कोंबडीचे महत्व
मध्य प्रदेशातील भिलांचल भागात प्रसिद्ध असलेली काळी कोंबडी ही कडकनाथ नावाने ओळखली जाते. या कोंबडीला व तिच्या अंड्यांना बाजारात मोठी मागणी असते. चांगल्या प्रतीची प्रोटीन या कोंबड्यांमध्ये असल्याचे सांगण्यात येते. या कोंबड्या धोनी आपल्या फार्म हाऊसवर पाळणार आहे. यासाठी धोनीने मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याला ऑर्डरही देऊ केली आहे. यासाठी त्याने अॅडव्हॉन्सही दिला आहे. या वृत्ताला मध्य प्रदेशातील कृषी विज्ञान केंद्रातील कडकनाथ कोंबडी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी असणाऱ्या डॉ. चंदन कुमार यांनीही दुजोरा दिला आहे. रांची येथील आपल्या ४३ एकराच्या फार्म हाऊसवर धोनीने सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून धोनी आता कडकनाथ कोंबड्याही पाळणार आहे.
हेही वाचा - रोहितला T20 कर्णधारपद न दिल्यास भारतीय संघाचे नुकसान - गंभीर
हेही वाचा - टीम इंडियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दिसणार नव्या जर्सीत