मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या शांत स्वभाव आणि हटके रणनितीमुळे ओळखला जातो. परिस्थिती कितीही खडतर असली तरी धोनी कधीच रागावलेला, वैतागलेला पाहायला मिळायचा नाही. या कारणानेच त्याला क्रिकेटविश्वात कॅप्टन कूल या नावानेही ओळखले जाते. पण सध्याच्या घडीला धोनी आपल्या मित्रांवर चांगलाच भडकत असल्याचे पाहायला मिळत आहे.
धोनी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर संघाबाहेर आहे. अशात त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना ऊत आला आहे. धोनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेले नाही. पण, धोनीच्या जवळच्या मित्राने, एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, 'माहीला निवृत्तीबद्दल विचारले की राग येतो, त्याच्यामते तो अजुनही सर्वात तंदुरुस्त यष्टीरक्षक आहे.'
धोनीचा मित्राने सांगितलं की, 'मागील काही महिन्यांमध्ये धोनी स्वतःच्या तंदुरुस्तीवर अधिक भर देत आहे. मी त्याला याआधी इतका सराव करताना कधीच पाहिलेले नाही. वय हे त्याच्या हातात राहिलेले नाही हे त्याला माहिती आहे. त्यामुळे अधिकाधिक सराव हाच त्याला संघात कायम राखू शकतो, ही बाब तो जाणून आहे.'
धोनीने कोणताही पाठिंबा नसताना स्वत:ला सिद्ध केले आहे. सध्या तो कठिण काळातून सावरत आहे. या कामी त्याला अनेक चाहत्यांचा पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी नक्की प्रयत्न करेल, असा विश्वासही त्या मित्राने बोलून दाखवला.
दरम्यान, विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान दिले. पण अनेक संधी मिळूनही पंतला यष्टीरक्षण आणि फलंदाजीत आपली छाप सोडता आली नाही. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुलकडे यष्टीरक्षण दिले आहे.
पुढाकार घ्या, कोरोनावर टीम इंडियासारखा विजय मिळवायचा आहे, मोदींचे आवाहन