दुबई - आयपीएलमध्ये शनिवारी रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. यंदाच्या मोसमातील चेन्नईचा हा पाचवा पराभव आहे. बंगळुरूच्या १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १३२ धावांवर ढेपाळला. या पराभवानंतर धोनीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
धोनी म्हणाला, "माझ्या मते गोलंदाजी करताना आम्ही शेवटच्या चार षटकांत चांगली कामगिरी केली नाही. आम्हाला चांगली कामगिरी करण्याची गरज होती. फलंदाजी ही आमची चिंता आहे आणि या सामन्यातही ते स्पष्ट झाले. आम्हाला याबद्दल काहीतरी करावे लागेल."
तो म्हणाला, "मला वाटते, की आपण अन्य मार्गाने खेळले पाहिजे. आम्ही बाद होण्याचा विचार करण्यापेक्षा मोठे फटके खेळले पाहिजे होते. येणाऱ्या सामन्यांमध्ये आपण हे करू शकतो. तुम्ही आतापर्यंतच्या स्पर्धेत कशी कामगिरी केली यावरही सर्व अवलंबून आहे. सहाव्या षटकानंतर आमची फलंदाजी कमी पडत आहे. मला वाटते की आम्ही चांगली कामगिरी केली नाही. सहा ते चौदा षटकांच्यादरम्यान गोलंदाजांसमोर कसे खेळायचे याबद्दल आम्ही कोणतीही रणनीती तयार केली नाही.''