हैदराबाद - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी खेळाडूंशी करार केला आहे. यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कोठेही स्थान देण्यात आलेले नाही. धोनीला मागील वर्षी केलेल्या करारातून मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, बीसीसीआयने धोनीला करारमुक्त करुन धोनीने निवृत्ती घ्यावी, असा अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे.
गुरूवारी बीसीसीआयने मयांक अग्रवाल, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर यांच्याशी करार करण्यात आले असल्याचे जाहीर केले. बीसीसीआयने करार केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली असून या करार यादीतून धोनीला वगळण्यात आले आहे. गेल्या वर्षी धोनीला 'अ' श्रेणीत स्थान देण्यात आले होते. पण या वर्षी त्याला कोणत्याही श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही.
या खेळाडूंना मिळाली बढती -
बीसीआयने दोन खेळाडूंना श्रेणीमध्ये बढती दिली आहे. यात केएल राहुलला 'ब' श्रेणीतून 'अ' गटात बढती मिळाली आहे. तर वृध्दीमान साहा 'क' गटातून 'ब' गटात गेला आहे.
बीसीसीआयने करार केलेले खेळाडू ( श्रेणीनुसार ) -
- ए + श्रेणी - विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
- ए श्रेणी - रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत
- बी श्रेणी - वृद्धीमान साहा, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल
- सी श्रेणी - केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर.