मुंबई - ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाला मोहम्मद सिराजच्या रुपाने आणखी एक स्टार गोलंदाज मिळाला. सिराजने देखील मिळालेल्या संधीचे सोने करत आपली छाप सोडली. या यशात सिराजच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. सिराजचे वडील रिक्षा चालवत होते. रिक्षा चालवून त्यांनी सिराजचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण केले.
इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह हे अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडले आणि मोहम्मद सिराजला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. सिराजने या संधीचे सोने केले. गाबा कसोटीत पाच विकेट्स घेऊन सिराजने अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत त्याने भारताकडून सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या आणि ऐतिहासिक मालिका विजयात हातभार लावला.
वडिलांच्या कबरीजवळ गेला आणि भावुक झाला
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला सुरुवात झाल्यानंतर मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठाणले. सिराज मायदेशी परतल्यानंतर पहिल्यांदा तो आपल्या वडिलांच्या कबरीवर जाऊन तिथे प्रार्थना केली. या दरम्यान, तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सिराजने बीएमडब्लू कार घेतली आहे.
रिक्षाच्या जागेवर बीएमडब्लू उभी पण...
मोहम्मद सिराजने शुक्रवारी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर बीएमडब्लू गाडीचा व्हिडीओ पोस्ट केला. मोहम्मद सिराजचे वडील रिक्षा चालवत होते. ते हयात असताना, घरासमोर रिक्षा उभी असायची पण आता सिराजने त्याच जागी बीएमडब्लू कार उभी केली आहे. पण ते पाहण्यासाठी त्याचे वडील सोबत नाहीत.
दरम्यान, सिराज रणजी हंगामात हैदराबादकडून खेळताना ४१ बळी घेतल्यामुळे प्रकाशझोतात आला. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादने त्याला आपल्या संघात घेतले. आता आयपीएलमध्ये आरसीबी संघातून खेळत आहे. आयपीएलनंतर सिराजची चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली आणि त्याने ही मालिका गाजवली.