नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडमधील विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या बायकोमुळे परत एकदा संकटात सापडला आहे. त्याच्याविरोधात सुरू असलेल्या पोलीस खटल्यामुळे अमेरिकेने त्याला व्हिसा देण्यास नकार दिला आहे. मात्र, बीसीसीआयने या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने त्याचा व्हिसा मंजूर झाला.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर घरगुती हिंसाचार आणि व्यभिचार केल्याचा आरोप असल्याने अमेरिकेने त्याच्या व्हिसावरती बंदी घातली आहे. घरगुती हिंसाचाराचा आरोप त्याची पत्नी हसीन जहाँ हिने केला असून खटला अजूनही प्रलंबित आहे.
ज्या खेळाडूंकडे अमेरिकेचा व्हिसा नाही त्यांच्यासाठी बीसीसीआयने पी -1 व्हिसा प्रकारात अर्ज केला होता. भारतीय खेळाडू आणि सहयोगी कर्मचाऱ्यांचा व्हिसा अर्ज बीसीसीआयने मुंबई येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासात सादर केला होता. त्यानंतर शमी सोडून इतर सर्व खेळाडूंना एका वेळी व्हिसा मिळाला होता.
त्यानंतर, बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी यांनी अमेरिकन अम्बासी यांना लिहिलेल्या पत्रात मोहम्मद शमी यांच्या कामगिरीसह त्यांची पत्नी हुसेन यांच्याशी चालू असलेल्या वादाबद्दल लिहिले असून बीसीसीआयमार्फत अतिरिक्त कागदपत्रे दूतावासात जमा केली. त्यानंतर शमीला व्हिसा मिळाला आहे.
टीम इंडिया 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज विरुध्द आपला पहिला सामना खेळणार आहे. ज्यासाठी लवकरच टीम इंडिया रवाना होणार आहे. भारतीय संघ तीन टी-20, तीन वनडे आणि तीन कसोटी सामने खेळणार आहेत. यामध्ये दोन टी -20 3 आणि 4 ऑगस्टला अमेरिकेच्या फ्लोरिडा राजाच्या लॉडरहिल शहरात सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क मैदानावर खेळले जातील.