किंग्स्टन - टीम इंडियाने विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कुरघोडी केली असली तरी, भारताच्या एका खेळाडूवर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. या खेळाडूने लागोपाठच्या सहा सामन्यांत एकही धाव केलेली नाही.
हा खेळाडू आहे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. शमीला शेवटच्या सहा सामन्यात एकही धाव करता आलेली नाही. विंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्येही त्याला आपले खाते उघडता आलेले नाही. सध्या सुरु असलेल्या सबिना पार्क स्टेडियममध्येही तो शून्यावर बाद झाला होता.

यापूर्वी हा विक्रम फिरकीपटू भागवत चंद्रशेखर यांच्या नावावर होता. चंद्रशेखर यांनादेखील सहा डावांमध्ये एकही धाव काढता आली नव्हती. शमीची ही कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून सुरु झाली होती. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात तो खाते न उघडताच बाद झाला होता. त्यानंतर तो असा पाचवेळा बाद झाला आहे.
याआधी, टीम इंडियाचा माजी गोलंदाज अजित आगरकर पाच वेळा शून्यावर तंबूत परतला आहे. १९९९ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पाच डावात आगरकर बाद झाला होता. मात्र , शमीने आता आगरकरचा विक्रम मोडित काढला आहे. शमीने आजतागायत ४२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ५८ डावांत फलंदाजी केली आहे. यादरम्यान तो १३ वेळा भोपळा न फोडताच बाद झाला होता.