विशाखापट्टणम - भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना १०७ धावांनी जिंकला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात मोहम्मद शमीने ३ गड्यांना तंबूत धाडत महत्वपूर्ण भूमिका निभावली. दरम्यान, शमी २०१९ या वर्षातला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं या विक्रमाच्या बाबतीत न्यूझीलंडच्या ट्रेट बोल्ट मागे टाकलं आहे.
शमीने २०१९ या वर्षात आजपर्यंत ४१ बळी मिळवले आहेत. अद्याप भारतीय संघाला यावर्षी आणखी एक एकदिवसीय सामना खेळायचा आहे. या सामन्यात शमीला आपले अव्वलस्थान अधिक भक्कम करण्याची संधी आहे. यावेळी शमीने न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला मागे टाकले, बोल्टच्या नावावर सध्या ३८ बळी जमा आहेत.
![mohammad shami becomes leading run scorer in odi cricket in 2019](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5112594_873913-shami-oct-6-ind-v-sa-pti-1.jpg)
२०१९ हे वर्ष शमीसाठी अतिशय चांगले ठरले. त्याने २०१९ विश्व करंडक, त्यानंतर घरच्या मैदानावरील कसोटी मालिकांमध्ये भेदक मारा केला. दरम्यान, शमी व्यतिरीक्त या यादीत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव सहाव्या स्थानावर आहे. त्याने ३२ बळी मिळवले आहेत.
२०१९ वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारे गोलंदाज -–
- मोहम्मद शमी – ४१ बळी
- ट्रेंट बोल्ट – ३८ बळी
- लॉकी फर्ग्यसन – ३५ बळी
- मुस्तफिजुर रेहमान – ३४ बळी
- भुवनेश्वर कुमार – ३३ बळी