नवी दिल्ली - शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण हे घडले आहे. अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. ३४ वर्षीय नबीने २ कसोटी सामन्यात केवळ २५ धावा केल्या आहेत. त्यामुळे इतके कमी कसोटी क्रिकेट खेळून निवृत्त होण्याच्या त्याच्या या निर्णयावर जगभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा - GREAT! सुपर मॉम यूएस ओपनच्या अंतिम फेरीत
सध्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यानंतर नबीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटकडे अधिक लक्ष केंद्रीत करता यावे, यासाठी त्याने हे पाऊल उचलले आहे.
नबीने टी-२० क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले असले तरी त्याला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने खेळलेल्या ४ डावांत फक्त २५ धावा केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत त्याला भोपळाही फोडता आला नव्हता.
रहमत शाह ठरला अफगाणिस्तानचा पहिला 'शतकवीर' -
अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाज रहमत शाहने शतक ठोकले. कसोटीमध्ये शतकी खेळी करणारा शाह अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. चित्तगांव येथील जहूर अहमद चौधरी मैदानावर रंगलेल्या कसोटी सामन्यात रहमतने १८६ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने १० चौकार आणि २ उत्तुंग षटकार लगावले.