लंडन - एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा ४-० ने धुव्वा उडवल्यानंतर इंग्लंडच्या संघाने मंगळवारी आगामी विश्वकरंडकासाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. त्यापूर्वी माजी खेळाडू मायकल वॉन यांनी सध्याच्या इंग्लंड संघाला आजवरचा सर्वोत्तम संघ असल्याचे म्हटले आहे.
वॉन म्हणाले की, 'मी आजवर इंग्लंडचे अनेक संघ पाहिले आहेत. मात्र ईऑन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील सध्याचा इंग्लंड संघ हा आतापर्यंतचा सर्वाधिक मजबूत संघ आहे. या विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असून इंग्लंड संघाकडे ही स्पर्धा जिंकण्याची नामी संधी असणार आहे.'
यापूर्वी क्रिकेट विश्वातील अनेक क्रिकेट पंडितांनी इंग्लंडच्या संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले आहे. इंग्लंडने आजवर १९७९, १९८७ आणि १९९२ साली अंतिम फेरी गाठली आहे. मात्र एकदाही इंग्लंडला विश्वकरंडक जिंकण्यात यश आले नाही.
असा आहे विश्वकरंडकासाठी यजमान इंग्लंडचा संघ
- ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.