कोलकाता - न्यूझीलंडमध्ये २०१८ साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात स्टार वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी यांने भेदक गोलंदाजी करत स्पर्धेत छाप सोडली होती. पण त्याच्यापाठीमागे असलेला वाईट काळ संपातच नाही. आयपीएल तोंडावर असताना त्याला दुखापत झाल्याने तो सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेला मुकणार आहे.
कोलकाता संघाच्या मॅनेजमेंटनी त्याच्या जागी वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरला सामील करुन घेतले आहे. नागरकोटीला मागील वर्षी आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ३.२ कोटी रुपयात विकत घेतले. पण दुखापतीमुळे तो संघात खेळू शकला नाही.
वॉरियरने यंदाच्या रणजी सीजनमध्ये केरळकडून खेळताना भेदक मारा करत त्याने एकूण ४४ गडी बाद केले आहेत. यंदाच्या सैयद अली मुश्ताक टी-२० ट्रॉफीत त्याने ६ सामन्यात ८ गडी बाद केले आहेत. त्यात आंधप्रदेश विरुद्ध घेतलेल्या सुंदर हॅटट्रीकचाही समावेश आहे. मागील वर्षी त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. त्याची बेस प्राइज २० लाख रुपये होती.
२७ वर्षीय वॉरियरला आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन आणि हॅरी गार्ने या गोलंदाजासोबत ड्रेसिंग रुम शेअर करायला मिळणार आहे. तो आधी रॉयल चॅलेजर्सच्या बंगळुरू संघात होता. पण अंतिम ११ जणांच्या संघात त्याला स्थान मिळाले नाही.