बाराबती - टी-२० मालिकेनंतर भारतीय संघाने विंडीजला एकदिवसीय मालिकेतही धूळ चारली. या मालिकेचा शेवटचा सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने विंडीजला ४ गडी राखून मात दिली. भारताच्या विजयात कर्णधार कोहलीने ८५ धावांचे उपयुक्त योगदान दिले. ही अनमोल खेळी करत कोहलीने आपल्यावरचा मोठा डाग पुसला आहे.
हेही वाचा - #१५YearsofDhoni : पहिल्याच सामन्यात झाला होता शून्यावर बाद, नंतर ठरला 'सर्वोत्तम कर्णधार'
'रनमशीन' असे बिरूद मिरवणाऱ्या कोहलीची या मैदानावर चांगली नव्हती. विंडीजविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याअगोदर कोहलीने या मैदानावर ४ सामने खेळले होते. आणि या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर फक्त ३४ धावा जमा होत्या. त्यामधील २२ धावांची खेळी ही कोहलीची सर्वोत्तम खेळी होती. मात्र, विंडीजविरूद्ध ८५ धावा ठोकून विराटने आपल्यावरचा मोठा डाग पुसला आहे.
यंदाचे वर्ष विराटसाठी चांगले होते. यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहली पुन्हा एकदा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने ४४ सामन्यात ६४.६० च्या सरासरीने २४५५ धावा केल्या आहेत. यासह विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या विक्रमात रोहित शर्माला पछाडले आहे. रोहित दुसऱ्या स्थानी असून त्याने यंदा २४४२ धावा ठोकल्या आहेत.