मुंबई - टी-ट्वेन्टी प्रकारात फलंदाजांपेक्षा गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. सामन्यातील प्रत्येक चेंडू सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता ठेवतो. टी-ट्वेन्टी सामन्यात निर्धाव षटकाचे महत्त्व खूप आहे. कारण, या प्रकारात एक षटक सामन्याचे चित्र पालटते. चला तर जाणून घेऊ आतापर्यंत कोणत्या गोलंदाजांनी आयपीएलमध्ये सर्वात जास्त निर्धाव षटके टाकली आहेत.
प्रवीण कुमार
प्रवीण कुमार दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करतो. त्यामुळे तो खूप घातक गोलंदाज ठरतो. प्रवीणने आयपीएलमध्ये आतापर्यंत ११९ सामने खेळले आहेत. प्रवीणने ४२० षटके गोलंदाजी करताना ९० गडी बाद केले आहेत. तर, एकूण १४ षटके निर्धाव टाकली आहेत.
इरफान पठाण
आयपीएलच्या पहिल्या सत्रात इरफान पठाण किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत होता. पठाणने आयपीएलमध्ये आतापर्यंत १०३ सामने खेळताना ३४०.३ षटके गोलंदाजी केली आहे. पठाणने ८० गडी बाद करताना १० षटके निर्धाव टाकली आहेत.
लसिथ मलिंगा
आयपीएलमध्ये २००९ साली मुंबई इंडियन्सकडून लसिथ मलिंगाने पदार्पण केले होते. मलिंगाने आतापर्यंत ११० सामन्यात १५४ गडी बाद केले आहेत. मलिंगाने ४२६.२ षटके टाकली आहेत. यात त्याने ८ षटके निर्धाव टाकली आहेत.
संदिप शर्मा
संदिप शर्मा २०१३ ते २०१७ ला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत होता. सध्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या संदिपने ६८ सामने खेळले आहेत. २४८.१ षटके गोलंदाजी करताना ८३ गडी बाद केले आहेत. यादरम्यान, संदिपने ८ षटके निर्धाव टाकली आहेत.
धवल कुलकर्णी
धवल कुलकर्णीने आयपीएलमध्ये मुंबई, राजस्थान आणि गुजरात संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. धवलने ८० सामने खेळताना २५२.५ षटके गोलंदाजी केली आहे. यामध्ये ७९ गडी बाद करताना ७ षटके निर्धाव टाकली आहेत.