वायनाड - भारत 'अ' आणि इंग्लंड लॉयन्स यांच्यात दुसऱ्या अनौपचारिक सामन्यास आजपासून सुरुवात झाली आहे. भारत 'अ' संघाचा कर्णधार के.एल.राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब फॉर्ममुळे बाहेर असलेल्या राहुलची बॅट पुन्हा तळपली. पहिल्या कसोटीत ८९ धावांची खेळी करणारा राहुलने दुसऱ्या कसोटीत ८१ धावा केल्या. त्याने अभिमन्यू ईश्वरन सोबत पहिल्या गड्यासाठी १७८ धावांची भागीदारी केली.
राहुलला ८१ धावांवर जॅक चॅपेलने बाद केले. या मालिकेतील त्याचे दुसरे शतक हुकले. त्यानंतर अभिमन्यू ईश्वरनने शानदार खेळ करत शतक ठोकले. मागील सामन्यात द्विशतक ठोकणारा प्रियांक पांचालने त्याला चांगली साथ दिली. ईश्वरन ११७ धावांवर बाद झाला.
पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या गोलंदाजाने प्रियांक पांचाल यास शेवटच्या चेंडूवर बाद केले. पांचालने ५० धावांची खेळी केली. पहिल्या दिवसअखेर भारत अ संघाने ३ बाद २८२ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंड लॉयन्सकडून टॉम बेली, डोमिनिक बेस आणि जॅक चॅपेल यांना प्रत्येक एक गडी बाद करण्यात यश आले. करुण नायर १४ धावांवर नाबाद परतला.