नवी दिल्ली - १९८७मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अनौपचारिक सामना न खेळल्यानंतर इम्रान खानने क्रीडा साप्ताहिकाच्या लेखात भारतीय आयोजकांवर टीका केली होती. त्यानंतर किशोर भीमानी यांनी पुढच्या अंकात इम्रानला "मला मच्छीबाजारातील वासाची अलर्जी आहे" असे उत्तर दिले होते.
प्रख्यात लेखक आणि समालोचक किशोर भीमानी यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले. भीमानी यांचे शहरातील एका नर्सिंग होममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. "माझ्यासाठी ते सर्व काही आहेत. ते माझे गुरू, एक हितचिंतक, मित्र आणि प्रेरणास्थान होते. मला नेहमीच त्यांचे लिखाण आणि दृष्टीकोन आवडायचा. ते खूप सरळ आणि प्रामाणिक होते", असे किशोर भीमानी यांचे मित्र आणि क्रिकेट समालोचक अरुण लाल यांनी त्यांच्या निधनानंतर सांगितले.
भारताचे प्रतिनिधित्व करणारे अशोक मल्होत्रा म्हणाले, "मी कोलकाता येथे स्थायिक झालो, तेव्हापासून भीमानी यांना ओळखत होतो. आम्हा सर्वांना ते खूप आवडायचे आणि ते एक चांगले व्यक्ती होते. त्यांनी आपल्या लेखनात अतिशय रंगीबेरंगी भाषा वापरली होती. ते एक उत्तम समालोचक होते. त्यांचे सर्वांशी अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते.''
बिशनसिंग बेदी यांनीही भीमानी यांच्याबद्दल आपले मत दिले. ते म्हणाले, " किशोर भीमानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ते एक उत्कृष्ट क्रिकेट लेखक होते. त्यांची पत्नी आणि त्याचा मुलगा गौतम यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो, देव त्यांना सदैव आशीर्वाद देवो."