पोर्ट ऑफ स्पेन - कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल) यंदाच्या हंगामात अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्ड ट्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार म्हणून कायम राहील. मागील हंगामात ड्वेन ब्राव्होच्या अनुपस्थितीत पोलार्डने संघाला प्लेऑफमध्ये नेले होते. 2017 आणि 2018 मध्ये संघाला विजेतेपद मिळवून देणारा ब्राव्हो दुखापतीमुळे मागील मोसमात खेळला नाही.
संघ व्यवस्थापन पोलार्डला कर्णधारपदावर ठेवण्यास सहमत आहे. पोलार्ड वेस्ट इंडिजच्या टी-20 संघाचा कर्णधारही आहे. संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वेंकी मैसूर म्हणाले, "वेस्ट इंडिजचा कर्णधार असलेला पोलार्ड हा आमचा कर्णधार आहे याचा आम्हाला आनंद आहे. मला माझ्या खेळाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे, त्यामुळे दुसऱ्याला कर्णधार करावे, असे ब्राव्हो दरवर्षी माझ्याकडे येऊन सांगायचा."
''दोघेही चांगले मित्र आहेत आणि दोघेही आम्हाला सीपीएल जिंकवून देण्यात मदत करतील'', असेही मैसूर यांनी सांगितले. सीपीएलचा यंदाचा हंगाम 18 ऑगस्टपासून सुरू होईल. या स्पर्धेनंतर आयपीएलही सुरू होणार आहे. पोलार्ड या आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू आहे.