हैदराबाद - आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्सने आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाने चेन्नईवर १ धावेने रोमहर्षक विजय साजरा केला. या विजयासह मुंबईच्या संघाने आयपीएलमधील चौथे विजेतेपद पटकावले. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू पोलार्डने २५ चेंडूत ४१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र, या सामन्यात पोलार्डच्या खेळीपेक्षा चर्चा झाली ती त्याने मैदानावरील पंचाच्या निर्णयाविरोधात व्यक्त केलेल्या नाराजीची.
![पोलार्ड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3265646_pollard_1305newsroom_1557733033_195.jpg)
हैदराबादला खेळल्या गेलेल्या या सामन्यात ड्वेन ब्राव्हो डावातील शेवटचे षटक टाकत होता. मात्र या षटकातील तिसरा चेंडू व्हाईड असतानाही पंच नितीन मेनन यांनी तो व्हाईड न दिल्याने पोलार्ड त्याच्यांवर नाराज झाला होता. पुढच्याच चेंडूवर पोलार्डने आपली नाराजी व्यक्त करत स्टम्प सोडून दूर निघून गेला. त्याच्या या कृत्यानंतर मैदानावरील दोन्ही पंचानी हरकत घेत पोलार्डशी बातचीत केली आणि खेळ चालू ठेवला.
या प्रकरणात आज कारवाई करत पोलार्डला अंतिम सामन्यातील २५ टक्के मानधनाचा दंड आयपीएलकडून ठोठावण्यात आला आहे. आयसीसीच्या Level 1 2.8 नियमांचे उल्लंघन केल्याने पोलार्डला दोषी ठरविण्यात आले आहे.