मुंबई - कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामावर टांगती तलवार आहे. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएल फ्रँचायझी अजूनही या स्पर्धेबाबत आशावादी आहेत. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनचा आयपीएल होण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
एका क्रीडाविषयक संस्थेद्वारे पीटरसनने आपली प्रतिक्रिया दिली. खरं तर माझा असा विश्वास आहे की कोणत्याही परिस्थितीत आयपीएलचे आयोजन झाले पाहिजे. ही क्रिकेट हंगामाची सुरुवात आहे. जगातील प्रत्येक खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहे. ही स्पर्धा तीन आठवड्यांची खेळवता येऊ शकते."
तत्पूर्वी, बीसीसीआयही आयपीएलसाठी आशावादी आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआय विदेशी क्रिकेट मंडळांसोबत चर्चेत असल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए), इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए)सारख्या इतर सर्व विदेशी क्रिकेट मंडळांनाही सद्यस्थिती आणि सरकारच्या निर्देशांबद्दल सतत माहिती देण्यात आली आहे.
कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली होती. बीसीसीआयने अद्याप याची घोषणा केलेली नाही.