वॉशिंग्टन - जपानचा आघाडीचा टेनिसपटू केई निशिकोरीला कोरोनाची लागण झाली आहे. वर्षातील चौथी ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या यूएस ओपनपूर्वी निशिकोरीला कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या चाचणीनंतर निशिकोरीने वेस्टर्न आणि सदर्न ओपनमधून माघार घेतली आहे. पुढील आठवड्यात या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
निशिकोरी म्हणाला, "मी सध्या फ्लोरिडामध्ये आहे. येथे मी कोरोना चाचणी केली असून मी पॉझिटिव्ह आढळलो आहे." कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याने स्वत: ला क्वारंटाइन केले आहे. अमेरिकेतील नियमांनुसार, ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, अशांना १० दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल.
यूएस ओपनची सुरुवात ३१ ऑगस्टपासून होईल. ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळली जाईल. कोरोनाव्हायरसमुळे यंदाच्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेची बक्षीसाची रक्कम कमी करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची बक्षीस रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत ८.५० लाख डॉलर्स (अंदाजे ६ कोटी ३६ लाख रुपये) कमी करण्यात आली आहे, असे यूएस टेनिस असोसिएशनने (यूएसटीए) सांगितले.