नवी दिल्ली - भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला टोला लगावला आहे. “तुम्हाला पैसै हवे असतील तर, सीमेवरच्या दहशतवादी कारवाया थांबवा”, असा सल्ला कपिल देव यांनी पाकिस्तानला दिला आहे. कोरोना युद्धात निधी जमवण्यासाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवण्यात यावी, असे मत अख्तरने मांडले होते. अख्तरच्या या मतावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.
कपिल देव यांनी यापूर्वीच अख्तरचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र, नंतर एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नावर कपिल देव यांनी पुन्हा उत्तर दिले. ते म्हणाले, “जर तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल तर सीमेवरील कारवाया (पाकिस्तानने पसरवलेला दहशतवाद) थांबवाव्या आणि त्या पैशातून रुग्णालये आणि शाळा तसेच आणखी बरेच काही आवश्यक काम केले जाऊ शकते.”
या परिस्थितीत क्रिकेट सामन्याबद्दल विचार करणे खूप लवकर होईल, असेही कपिल देव यांनी म्हटले आहे. त्यांनी भारत सरकारच्या लॉकडाऊनचे कौतुकही केले. ते म्हणाले, की सरकारचा बंदीचा आदेश पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत मदत करण्यासाठी दान देऊन देशाला मदत करण्याचे आवाहनही माजी कर्णधाराने केले आहे.