मेलबर्न - भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याला सुरुवात होणाआधीच यजमान ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाने मालिकेतून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. रिचर्डसन दाम्पत्याला नुकतीच पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे आपल्या बाळासोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी रिचर्डसनने हा निर्णय घेतला आहे.
आता 'हा' खेळाडू ऑस्ट्रेलिया संघात
केन रिचर्डसनच्या जागी संघात वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय याला ऑस्ट्रेलिया संघात संधी देण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियाने आयपीएलच्या आधी इंग्लंडमध्ये निर्धारित षटकांची मालिका खेळली होती. या मालिकेत टायचा संघात समावेश होता.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काय म्हटलं
रिचर्डसनसाठी माघार घेण्याचा निर्णय खूप कठीण होता. पण निवड समिती आणि सर्व खेळाडूंनी त्याच्या या निर्णयाचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे. रिचर्डसनला पत्नी नायकी आणि बाळासोबत वेळ घालवायचा आहे. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड नेहमीच खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असते. खासकरून सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात प्रत्येकाच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या मंडळ समजून घेत आहे, असे मुख्य निवडकर्ते ट्रेव्हर होन्स यांनी सांगितले.
हेही वाचा - Video : सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूला आली 'लघुशंका'; फलंदाजी सोडून पळाला टॉयलेटच्या दिशेने
हेही वाचा - Ind Vs Aus : उसळत्या चेंडूंचा सामना करण्यासाठी भारतीय संघाचा खास सराव; पाहा व्हिडिओ