लंडन - इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीचा 'बाण' असेलला जोफ्रा आर्चर कोरोना चाचणीत निगेटिव्ह आढळला आहे. त्यामुळे तो आता संघाच्या सहकाऱ्यांमध्ये सामील होऊ शकेल. इंग्लंडचा 30 सदस्यीय प्रशिक्षण गट एजिस बाऊल येथे जैव सुरक्षित वातावरणात तयारी करत आहे.
इंग्लंडच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य असलेला आर्चर त्याच्या घरीच आजारी पडल्याने संघाच्या प्रशिक्षण संघात सामील होऊ शकला नाही. एका वृत्तानुसार, आर्चरच्या दुसर्या चाचणीतही तो निगेटिव्ह आढळला आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघानेही सोमवारी इंग्लंडमध्ये 14 दिवसांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण केला आहे. इंग्लंडचा संघही मैदानातील हॉटेलमध्ये एकांतात राहणार आहे. संघाच्या सरावाचा पहिला दिवस गुरुवारी असेल. यात अर्धे खेळाडू सकाळी आणि उर्वरित खेळाडू दुपारी सराव करतील. इंग्लंड आपला तीन दिवसीय सराव सामना 1 जुलैपासून खेळणार आहे. त्यानंतर, पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला जाईल.
उभय संघात तीन कसोटी सामने विनाप्रेक्षक खेळण्यात येणार आहेत. पहिला सामना 8 जुलैला साऊथम्पटन येथे खेळला जाईल. दुसरा 16 ते 20 जुलै दरम्यान आणि तिसरा 24 ते 28 जुलै या काळात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने ओल्ड ट्रँफर्ड मैदानात खेळले जाणार आहेत. दरम्यान, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे.