मँचेस्टर - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला वेस्ट इंडिजबरोबर खेळल्या जाणार्या कसोटी मालिकेत जैव सुरक्षित प्रोटोकॉल तोडल्याबद्दल इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) दंड ठोठावला आहे. यासोबतच त्याला लेखी इशारा देखील देण्यात आला आहे.
हा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे ईसीबीने सांगितले आहे. या बैठकीत ईसीबी क्रिकेट संचालक अॅश्ले जाइल्स, व्यावसायिक क्रिकेटर्स असोसिएशनचे सदस्य आणि आर्चरचे एजंट उपस्थित होते. ईसीबीने म्हटले आहे, ''17 जुलैला झालेल्या शिस्त समितीच्या बैठकीनंतर आर्चरला 30 हजार पाऊंडचा दंड ठोठावण्यात आला आहे.''
या शिक्षेमुळे आर्चरला दुसर्या कसोटी सामन्यातून बाद केले गेले आहे. "या कालावधीत त्याच्या दोन कोरोना चाचण्या होणार असून त्या निगेटिव्ह येणे आवश्यक आहेत. 21 जुलैला तो संघात येऊ शकतो," असेही ईसीबीने म्हटले आहे.
पहिला कसोटी सामना संपल्यानंतर इंग्लंडचा संघ मँचेस्टरकडे रवाना झाला. या प्रवासादरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंना क्रिकेट बोर्डाने विशेष कारची सोय करुन दिली होती. प्रवासादरम्यान खेळाडूंना कुठेही न थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र जोफ्रा आर्चर मँचेस्टरदरम्यान आपल्या घरी गेला.