नवी दिल्ली - सन 2019च्या विश्वकंरडक स्पर्धेत भारतावर मिळवलेला विजय हा अविस्मरणीय क्षण असल्याचे न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जिमी नीशमने म्हटले. नीशमने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ट्विटर हँडलवर ही प्रतिक्रिया दिली.
भारतावरील विजयानंतर सहकाऱ्यांसोबत ड्रेसिंग रूममध्ये बसणे खास असल्याचे नीशमने सांगितले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळलेला पहिला उपांत्य सामना पावसामुळे दोन दिवस चालला. भारताने न्यूझीलंडला 8 गडी बाद 239 वर रोखले होते, परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताला 221 धावांत गारद केले.
या सामन्यात भारताने 92 धावांवर 6 गडी गमावले. त्यानंतर रवींद्र जडेजाने 59 चेंडूंत 77 धावा केल्या. त्याने महेंद्रसिंह धोनीसोबत 116 धावांची भागीगारी रचली. धोनी 49व्या षटकात बाद झाला आणि सामना भारताच्या नियंत्रणाबाहेर गेला.
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना 'न भूतो ना भविष्यती' असा झाला. या सामन्याचा थरार पाहून अनेकाच्या ह्दयाचे ठोके वाढले होते. निर्धारीत 50-50 षटकांत सामना अनिर्णीत राहिला. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघानी समान धावा काढल्या. यामुळे सुपर ओव्हरच्या नियमानुसार सामन्यात मारलेल्या चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले.