नवी दिल्ली - 'यॉर्करकिंग' म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने जगातील सर्वोत्तम यॉर्कर गोलंदाजाचे नाव सांगितले आहे. हा सन्मान बुमराहने श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला दिला. मलिंगा आणि बुमराह इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सकडून खेळतात.
मुंबई इंडियन्सने केलेल्या ट्विटमध्ये बुमराहने ही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "मलिंगा हा जगातील सर्वोत्कृष्ट यॉर्कर गोलंदाज आहे. तो आपल्या फायद्यासाठी या अस्त्राचा वापर बर्याच दिवसांपासून करत आहे." काही दिवसांपूर्वी, बुमराहने लाळेच्या वापरांसंबधी मत दिले होते.
बुमराह म्हणाला, ''मैदानात गळाभेट घेणाऱ्यापैंकी मी नाही. पण लाळेची कमतरता तुम्हाला भासू शकते. क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यावर मार्गदर्शक सूचना काय असतील हे मला माहित नाही. परंतु यासाठी काहीतरी पर्याय असावा. चेंडूवर लाळ न वापरल्याने क्रिकेट फलंदाज अनुकूल ठरेल. लाळ न वापरल्याने गोलंदाजांना अडचण निर्माण होते. मैदाने लहान होत आहेत आणि विकेटही सपाट होत आहेत.
''बुमराह म्हणाला, “आम्हाला चेंडूची चमक कायम राखण्यासाठी पर्यायाची आवश्यकता आहे. जेणेकरून तो स्विंग किंवा रिव्हर्स स्विंग करू शकेल.” गेल्या काही वर्षांपासून वेगवान गोलंदाजांना परिस्थिती अनुकूल असल्याचे बिशपने सांगितले. तेव्हा बुमराहने या प्रतिक्रियेशी सहमती दर्शवली. तो म्हणाला, ''कसोटी क्रिकेटमध्ये हे खरे आहे. म्हणूनच हा माझे माझे आवडते स्वरूप आहे. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये चेंडूला रिव्हर्स स्विंग मुळीच मिळत नाही.''
चेंडूला चमकवण्यासाठी गोलंदाज लाळ आणि घामाचा वापर करतात. मात्र, कोरोनामुळे क्रिकेटमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत.