मुंबई - आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ मायदेशी परतला आहे. विश्वचषकासाठीच्या ऑस्ट्रेलियन संघात जेसनची निवड झाल्याने त्याला घरी परतावे लागले आहे. २ मेपासूम ऑस्ट्रेलियात आगामी विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंच्या तयारीसाठी एका खास कँपची सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी बेहरनडॉर्फने एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणाला, 'आयपीएलमध्ये खेळून खूप मजा आली. मुंबईचा संघ हा एक शानदार संघ असून, अशा संघासाठी खेळायला मिळणे हा एक वेगळाच अनुभव होता. आयपीएलमध्ये काहीच आठवड्यानंतर मुंबई फायनल खेळताना दिसेल, अशी मला आशा आहे, तोपर्यंत बाय बाय.'
यापूर्वी राजस्थानच्या संघातील इंग्लंडचे खेळाडू जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि हैदराबादचा धडाकेबाज सलामीवीर जॉनी बेअरस्टो मायदेशी परतले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर लवकरच माघारी परततील.
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा.