नवी दिल्ली - दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट मैदानावर म्हणजेच जुन्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिवंगत केंद्रीय मंत्री आणि दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) माजी अध्यक्ष अरुण जेटली यांचा पुतळा बसवला जाणार आहे. जेटलींच्या ६८व्या जयंतीनिमित्त सहा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले जाईल. गृहमंत्री अमित शाह स्वत: पुतळ्याचे अनावरण करतील. या पुतळ्याची किंमत १५ लाख एवढी असून त्याचे वजन ८०० किलो आहे.
हेही वाचा - VIDEO : 'हाता खुजा रे थे क्या'; मोहम्मद सिराजची खास हैद्राबादी ढंगात मुलाखत
जेटली हे १९९९ ते २०१३ या काळात दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष होते. आता त्यांचा मुलगा रोहन जेटली हे या पदावर आहेत. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि अनुराग ठाकूर, क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह आणि अरुण जेटली यांच्या कुटुंबासमवेत गृहमंत्री अमित शहा जेटली यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची शक्यता आहे. तसेच भारत आणि दिल्लीचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरही या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
केवळ ५० जणांची असणार उपस्थिती -
कोरोनामुळे या समारंभात केवळ ५० लोक उपस्थित असतील. यात क्रीडामंत्री किरेन रिजिजू, १८ डीडीसीए संचालक यांची उपस्थिती असू शकते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, जेटली यांचा पुतळा शनिवारी दुपारी मैदानात पोहोचला आहे. भारत आणि दिल्लीचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी मात्र जेटलींचा पुतळा स्टेडियममध्ये बसवण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. एका महान खेळाडूचा पुतळा बसवला गेला पाहिजे, असे मत बेदींनी व्यक्त केले.