नवी दिल्ली - १९८०-९० च्या दशकात क्रिकेटमध्ये विंडीजच्या संघाचा सुवर्णकाळ मानला जायचा. या दशकात त्यांच्याकडे अफलातून शरीरयष्टी असलेले फलंदाज आणि समोरच्या फलंदाजांना भयभीत करुन सोडणारे उंचपूरे वेगवान गोलंदाज होते. त्यावेळी अन्य संघांकडे असे गोलंदाज कमी पाहायला मिळत होते. कालांतराने क्रिकेटमध्ये विविध बदल झाले. जे संघ लिंबूटिंबू मानले जात होते त्यानी विविध अंगानी प्रगती केली आणि चांगल्या कामगिरीच्या जोरावर इतर संघांवर वरचढ झाले.
हेही वाचा - अर्धशतक इशांतचं, सेलिब्रेशन कोहलीचं
भारताकडे अशाच उंचपुऱ्या गोलंदाजांची कमतरता होती. मधल्या काळात वेंकटेश प्रसादला सोडले तर, इतर गोलंदाजही मध्यम उंचीचे होते. त्यानंतर २००६ मध्ये टीम इंडियामध्ये एका वेगवान गोलंदाजाची निवड झाली. या गोलंदाजाची उंची होती ६ फूट ५ इंच आणि वय होते अवघे १८ वर्ष. आज त्याच गोलंदाजाचा ३१ वा वाढदिवस आहे.
नुकताच कपिल देव यांचा विक्रम मोडलेल्या इशांत शर्माचा आज वाढदिवस आहे. इशांतने कसोटी क्रिकेटमध्ये आशिया खंडाबाहेर सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. २ सप्टेंबर १९८८ रोजी दिल्लीत त्याचा जन्म झाला. २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलेल्या इशांतच्या आयुष्यात अनेत चढउतार आले. या सामन्यात त्याला एकच विकेट मिळाली होती.
हेही वाचा- जे कोणत्याही भारतीयाला जमले नाही ते मलिंगाने करुन दाखवले
इशांतला खरी ओळख मात्र पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात मिळाली होती. तेव्हा त्याने पाच बळी घेतले होते. ९२ कसोटीमध्ये त्याने २७७ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगला इशांतने कसे आपल्या वेगवान गोलंदाजीने नाचवले होते ते अजूनही चाहते विसरलेले नाहीत.
२००६ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली होती. या मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत तो संघात असणार याबद्दल ठरवलेही गेले होते. मात्र, नंतर बातमी अशी आली की त्याचे जाणे रद्द केले गेले. नुकत्याच सुरु असलेल्या विंडीज मालिकेमध्ये भारताच्या हनुमा विहारीने आपले कसोटीतील पहिले शतक झळकावले. त्याने इशांतसोबत शतकी भागिदारीही रचली. मात्र, सर्वात जास्त चर्चा झाली ती याच सामन्यात इशांतने केलेल्या त्याच्या पहिल्यावहिल्या अर्धशतकाची!