नवी दिल्ली - नुकतीच निवृत्तीची घोषणा केलेल्या गोलंदाज इरफान पठाणने भारतीय क्रिकेटला बहुमूल्य योगदान दिले. 'एकेकाळी आपल्या 'स्विंग' गोलंदाजीमुळे भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा इरफान त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी कुठेतरी हरवला', असं लोकं आजही म्हणतात. त्याने क्रिकेटमध्ये केलेल्या एका मोठ्या कारनाम्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली. या कारनाम्याने त्याने आपली ओळख जगाला करून दिली.
हेही वाचा - एक सामना...४८ षटकार...७० चौकार...८१८ धावा!
२९ जानेवारी २००६ म्हणजे १४ वर्षांपूर्वी, इरफाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेतली होती. पाकिस्तानची वरची फळी उद्ध्वस्त करत इरफानने सलमान बट्ट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ या दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले होते. त्याच्या या प्रतापामुळे त्याने आपले नाव सर्वदूर पोहोचवले. कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा भारतीय ठरला होता. त्याच्या व्यतिरिक्त हरभजन सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी कसोटीत हॅट्ट्रिक नोंदवली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
भारतीय क्रिकेट विश्वात 'स्विंगचा किंग' अशी ओळख निर्माण केलेल्या इरफान पठाणने मागच्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. गोलंदाज म्हणून संघात पदार्पण केलेल्या इरफानने फलंदाजीतही छाप सोडली. निवृत्ती घेतल्यानंतर 'ज्या वयात लोकांचं करियर सुरू होतं, त्या वयात माझं संपलं' अशी इरफानने खंत व्यक्त केली होती.
इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स, एकदिवसीय मध्ये १५४४ धावा आणि १७३ विकेट्स आणि टी-२० मध्ये १७२ धावा आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत.