मुंबई - भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेबाबत भविष्यवाणी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकेल, असे इरफानने म्हटलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. चेन्नईत होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ कस्सून सराव करत आहेत. या सामन्याला सुरूवात होण्याआधीच इरफान पठाणने भारतीय संघ, उभय संघातील ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकेल, अशी भविष्यवाणी केली आहे.
इरफान म्हणाला की, 'भारतीय संघ निश्चितपणे ही मालिका जिंकेल. यात कोणतेही दुमत नाही. इंग्लंड संघाने देखील नुकत्याच संपलेल्या श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी केलेली आहे. श्रीलंकेच्या खेळपट्टीप्रमाणेच भारताच्या खेळपट्ट्या देखील आहेत. इंग्लंडसाठी रुटची भूमिका महत्वाची ठरणार आहे.'
दरम्यान, भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा केला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा कसोटी मालिकेत २-१ ने पराभव केला. तर दुसरीकडे इंग्लंड संघाने श्रीलंकेला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत २-० ने व्हाइटवॉश दिला आहे. दोन्ही संघाची कामगिरी पाहिली असता, दोन तुल्यबळ संघात ही मालिका होत आहे. यामुळे ही मालिका रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा - गुड न्यूज : टीम इंडियाचा स्टार फलंदाज दुखापतीतून सावरला, इंग्लंडविरुद्ध खेळणार
हेही वाचा - केकेआरचा स्टार खेळाडू नरेनच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन