मुंबई - संजू सॅमसनच्या वादळी शतकानंतरही राजस्थान रॉयल्सला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ४ धावांनी पराभव पत्कारावा लागला. संजूने ६३ चेंडूमध्ये ११९ धावांची खेळी केली. या खेळीत १२ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. पण त्याची ही संघर्षपूर्ण शतकी खेळी राजस्थानला विजय मिळवून देऊ शकली नाही. राजस्थानचा थोडक्यात हुकलेल्या पराभवानंतर संजूने भावनिक प्रतिक्रिया दिली.
सामना संपल्यानंतर संजू म्हणाला, 'माझ्या भावनांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. राजस्थानला विजय मिळवून देण्याचे माझे ध्येय होते. मला वाटतं की, या खेळीपेक्षा मी अधिक काय करु शकलो असतो.'
शेवटच्या चेंडूवर षटकार मारेल, असे मला वाटलं. मी मोठ्या ताकदीने तो चेंडू देखील टोलावला. पण तो सीमारेषेबाहेर न जाता उंच उडाला आणि दीपक हुडाने तो पकडला. शेवटी हा सगळा खेळाचा भाग आहे. आम्हाला वाटले की, विकेट चांगली आहे आणि आम्ही लक्ष्य गाठू पण आम्ही जिंकता जिंकता हरलो, असेही संजू सॅमसन म्हणाला.
दरम्यान, पंजाबने प्रथम फलंदाजी करत केएल राहुलच्या ९१ आणि दीपक हु्डडाच्या ६४ धावांच्या जोरावर २२१ धावा केल्या होत्या. पण राजस्थानला २१७ धावा करता आल्या. राजस्थानला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज होती. तेव्हा अर्शदीपने स्लोवर वन चेंडू टाकत संजूला चकवले. संजूने जोराचा फटका मारला आणि तो चेंडू सीमारेषेवर दीपक हुडाने पकडला. शेवटी राजस्थानचा संघ सामना जिंकता जिंकता हरला.
हेही वाचा - IPL २०२१ : संजू सॅमसनचे विक्रमी शतक; असा पराक्रम कोणालाही जमला नाही
हेही वाचा - आयपीएल : रोमांचक सामन्यात पंजाबचा राजस्थानवर ४ धावांनी विजय; संजू सॅमसनचे शतक निरर्थक