मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या हंगामाचा पहिला सामना चेन्नईत खेळला जाणार असून हा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. या सामन्याआधी बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख फिरकीपटू आयपीएलच्या पहिल्या काही सामन्याला मुकणार आहे.
बंगळुरू संघाचा फिरकीपटू अॅडम झम्पा मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यासह काही सामन्याला मुकणार आहे. झम्पा लग्न करणार आहे. यामुळे तो पहिले काही सामने खेळणार नाही. याची माहिती बंगळुरूचे क्रिकेट संचालक माइक हेसन यांनी दिली. फ्रेंचायझीच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली.
हेसन म्हणाले, 'पहिल्या काही सामन्यासाठी सर्व विदेशी खेळाडू उपलब्ध होणार नाहीत. झम्पा लग्न करणार आहे. फ्रेंचायझीला त्याच्याविषयी माहिती होती. जेव्हा तो संघात सामील होईल तेव्हा, तो या स्पर्धेत योगदान देईल.'
दरम्यान, बंगळुरू संघाला अद्याप आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी ते उत्सुक आहेत. यासाठी संघ व्यवस्थापनाने खास रणणिती आखत तीन अष्टपैलू खेळाडूंना आपल्या संघात घेतलं आहे. बंगळुरूने कायले जेमिन्सन (१५), ग्लेन मॅक्सवेल (१४.२५) आणि डॅनियल ख्रिश्चन (४.८) यांना आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
हेही वाचा - पाहुण्या संघाच्या अडचणीत भर, इंग्लंडचे २ महत्त्वाचे खेळाडू जायबंदी
हेही वाचा - प्रसिद्ध कृष्णा एकदिवसीय पदार्पणात 'अशी' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच गोलंदाज