दुबई - गोलंदाजीतील अपयशामुळे समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरलेले किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आज सामना होणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची मदार ही फलंदाजांवर असणार आहे. यामुळे दुबईमध्ये होणारा हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
किंग्ज इलेव्हनला आतापर्यंत झालेल्या पाचपैकी चार सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. तर सनरायजर्सने तीन सामने गमावले तर दोन सामन्यात त्यांना विजयाची चव चाखता आली आहे. गुणतालिकेत हैदराबाद सहाव्या तर पंजाब तळाशी म्हणजे आठव्या स्थानावर आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबची फलंदाजी फार्मात आहे. कर्णधार केएल राहुल, मयांक अग्रवाल सातत्याने धावा करत आहेत. निकोलस पुरनही चांगली कामगिरी करीत आहे. पण ग्लेन मॅक्सवेलला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. कमकुवत मारा हा पंजाबसाठी डोकेदुखी ठरला आहे. कारण मोहम्मद शमीचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव पाहायला मिळाला आहे.
दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादला या सामन्याआधीच मोठा धक्का बसला आहे. त्याचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. फलंदाजीत, आघाडीच्या फळीत जॉन बेयरस्टो, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, केन विलियम्सन यांच्यासारखे फलंदाज हैदराबादच्या ताफ्यात आहेत. पण गोलंदाजी हैदराबादसाठी चिंतेचा विषय आहे. हैदराबादला पाचव्या गोलंदाजाची उणीव जाणवत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी युवा अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद यांच्यावर, कर्णधार वॉर्नरला विश्वास टाकावा लागत आहे. शिवाय संदीप शर्मा व सिद्धार्थ कौल हे धावा रोखण्यात अपयशी ठरले आहेत. पण राशिद खानने आपली छाप सोडली आहे.
- आजच्या सामन्यात असा असू शकतो हैदराबादचा संघ -
- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, केन विल्यमसन, प्रियम गर्ग, जॉनी बेयरस्टो, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, राशिद खान, सिद्दार्थ कौल, टी नटराजन आणि संदीप शर्मा.
- आजच्या सामन्यात असा असू शकतो पंजाबचा संघ -
- ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, मनदीप सिंह, निकोलस पूरन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हूडा, ख्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रेल.