अबुधाबी - सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. कोलकाताने २० षटकांत १६३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनेही समान १६३ धावा करत सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये, आयपीएल २०२० चा पहिलाच सामना खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसननेही दोन विकेट घेत केकेआरच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने सुपर ओव्हरमध्ये भेदक गोलंदाजी करत केवळ २ धावा देत २ बळी घेऊन हैदराबादचा डाव संपवला. तर इयॉन मॉर्गन-दिनेश कार्तिक जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. फर्ग्युसनने मूळ सामन्यात १५ धावांत ३ विकेट घेतल्या.
कोलकाताने दिलेल्या १६४ धावांचा पाठलाग करण्यासाठी सनरायझर्स हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोसह केन विल्यमसन सलामीला आला. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी धावा पूर्ण करताना संघाला दमदार सुरुवात करून दिली. सातव्या षटकात केकेआरला ही सेट जोडी फोडण्यात यश आले. लॉकी फर्ग्युसनने पहिल्याच चेंडूवर विल्यमसनला माघारी पाठवले. विल्यमसनने १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने तिसऱ्या क्रमांकावर प्रियम गर्गला पाठवले, परंतु तोही (४) फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. वरुण चक्रवतीने हैदराबादचा स्फोटक सलामीवीर बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टोने २८ चेंडूत ७ चौकारांसह ३६ धावा केल्या. फर्ग्युसनच्या यॉर्करने मनीष पांडेचा (६) त्रिफळा उडवला.
लॉकी फर्ग्युसनने ४ षटकांत १५ धावांत ३ विकेट घेतल्या. त्याने गोलंदाजीत तर कमाल केलीच, पण क्षेत्ररक्षणातही देखील त्याने धम्माल केली. अब्दुल समदने टोलावलेला चेंडू फर्ग्युसनने षटकार जाऊ न देता टिपला आणि सीमारेषेच्या आत असलेल्या शुबमन गिलकडे फेकला. यामुळे समदला २३ धावांवर माघारी जावे लागले. डेव्हिड वॉर्नरने मॅच फिनिशरची भूमिका बजावली, पण त्याला विजय मिळवून देता आला नाही. आंद्रे रसेलने टाकलेल्या अखेरच्या षटकांत वॉर्नरने विजयासाठी आवश्यक १८ धावांपैकी १७ धावा करता आल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनने २ धावा देत डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समदला क्लिन बोल्ड केले. हैदराबादने दिलेले ३ धावांचे लक्ष्य कोलकाताने दोन चेंडू राखून पूर्ण केले.
तत्पूर्वी, हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला केकेआरला आमंत्रित केले. तेव्हा केकेआरचे सलामीवीर राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी आश्वासक सुरूवात केली. संघाची धावसंख्या ४८ असताना राहुल त्रिपाठी टी. नटराजनच्या गोलंदाजीवर चुकला. नटराजनचा चेंडू बॅटला कट घेत यष्ट्यांवर आढळला. राहुलने २६ धावा केल्या. यानंतर गिल आणि नितीश राणा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सुरुवातीला सावध खेळ केला. पण फटकेबाजीच्या नादात शुबमन गिल (३६) बाद झाला. राशिद खानच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याचा नादात उडालेला झेल प्रियम गर्गने टिपला.
गिल पाठोपाठ नितीश राणा (२९) देखील माघारी परतला. त्याला शंकरने प्रियम गर्गकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसेल या जोडीकडून मोठ्या खेळीची आपेक्षा होती. पण ती फोल ठरली. रसेल पुन्हा फेल झाला. ९ धावांवर असताना नटराजनला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उडालेला झेल विजय शंकरने टिपला. यानंतर मॉर्गन-कार्तिक जोडीने केकेआर मजल मारून दिली. मॉर्गनने २२ चेंडूत ३४ धावा केल्या तर, कार्तिक १४ चेंडूत २९ धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून नटराजनने दोन तर राशिद, विजय शंकर, थम्पी यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.