शारजाह - मुंबई इंडियन्सने काल, शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा दारूण पराभव केला. मुंबईने चेन्नईला १० गडी राखत धूळ चारली. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. मुंबईच्या दमदार विजयानंतर गुणतालिकेत नेमका काय बदल झाला पाहा...
चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा तिसऱ्या क्रमांकावर होता. कारण नऊ सामन्यांमध्ये मुंबईने सहा विजय मिळवले होते, तर त्यांना तीन पराभवांचा सामना करावा लागला होता. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईने मोठा विजय साकारला. या विजयासह मुंबईने दोन गुण तर कमावलेच पण त्याचबरोबर आपला रनरेटही वाढवला.
दिल्लीची दुसऱ्या स्थानावर घसरण
या सामन्यापूर्वी मुंबईचे १२ गुण होते. पण चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील विजयामुळे मुंबईच्या संघाचे १४ गुण झाले आहेत. पण सध्याच्या घडीला मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू यांचे समान १४ गुण झालेले आहेत. पण चांगल्या रननेटमुळे मुंबईच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. मुंबईच्या मोठ्या विजयाने दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचबरोबर बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
चेन्नईचे आव्हान संपुष्टात
दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सचे या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. कारण आता यापुढील तिन्ही सामने जरी चेन्नईच्या संघाने जिंकले तरी त्यांना बाद फेरी पोहोचता येणार नाही. त्यामुळे आता त्यांच्यासाठी हे तीन सामने फक्त औपचारीकता असतील. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. या ११ सामन्यांपैकी त्यांना फक्त तीनच विजय मिळवता आले आहेत, तर त्यांना आठ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अशी आहे गुणतालिका
सद्याच्या घडीला मुंबईचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. दुसऱ्या स्थानावर दिल्लीचा संघ आहे. तर विराटचा बंगळुरू संघ तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर कोलकाताचा संघ आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे हैदराबाद आणि पंजाबचा संघ आहे. सातव्या स्थानी राजस्थान असून चेन्नई आठव्या स्थानावर आहे.