मुंबई - इंडियन प्रिमीयर लीगच्या २०२० सालाच्या हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होणार आहे. तर अंतिम सामना मुंबईत २४ मे रोजी खेळवण्यात येईल. आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयपीएल २०२० मध्ये यावेळी फक्त ५ दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तसेच डे-नाईट सामन्याला ८ वाजता सुरूवात होईल, असे बैठकीत ठरले आहे. दरम्यान, या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा आणि अन्य पदाधिकारी हे देखीत उपस्थित होते.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात डे-नाईट सामन्याची वेळ ८ ऐवजी ७.३० करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण, हा प्रस्ताव बैठकीत फेटाळण्यात आला आहे. यामुळे सर्व सामने ८ वाजता सुरूवात होतील.
मुंबईत अंतिम सामना -
आयपीएल २०२० हंगामासाठीची लिलाव प्रक्रिया डिसेंबर २०१९ मध्ये पार पडली. त्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक ठरवले जात असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा आयपीएलचा अंतिम सामना हा जगभरातील सर्वात मोठ्ठे स्टेडियम अशी ओळख असलेल्या अहमदाबाद येथील मैदानात होणार, अशी चर्चा होती. पण ती चर्चा निष्फळ ठरली आणि अंतिम सामना मुंबईत होणार, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा - चहलने गुप्टीलला हासडली हिंदीतून शिवी, व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - IND Vs NZ २nd T-२०: भारताचा न्यूझीलंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय