मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीने आपल्या खेळाडूंसाठी काही उपाययोजना आखल्या आहेत. यात फ्रेंचायझी सर्व खेळाडूंना एक स्मार्ट रिंग देणार आहे. या रिंगव्दारे खेळाडूंचे ह्रदयाचे ठोके, श्वसन गती, शरीराचे तापमान यासारख्या बाबींची माहिती सहजरित्या पाहता येणार आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, बीसीसीआयने आयपीएलचा १३ हंगाम युएईमध्ये हलवला. युएईमध्ये देखील कोरोनाच्या धोक्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. बीसीसीआयने खेळाडूंसाठी बायो बबलची निर्मिती केली आहे. यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. या शिवाय बीसीसीआयने खेळाडूंना ब्लूटूथ डिव्हाइस दिलं आहे. या माध्यमातून खेळाडूंचे डेली फिटनेस नोंदवले जात आहे.
मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीने बीसीसीआयच्या उपाययोजना व्यतिरिक्त आणखी काळजी घेतली आहे. त्यांनी आपल्या खेळाडूंना एक स्मार्ट रिंग दिली आहे. या रिंगच्या माध्यमातून ह्रदयाचे ठोके, श्वसन गती, शरीराचे तापमान यासारख्या बाबींवर सहज लक्ष ठेवता येणार आहे. याआधी नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने आपल्या खेळाडूंसाठी या स्मार्ट रिंगचा वापर केला होता.
दरम्यान, आयपीएल स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच चेन्नईच्या १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर बीसीसीआयच्या मेडिकल टीममधील एक जण कोरोनाबाधित आढळला. यामुळे बीसीसीआय आवश्यक ती उपाययोजना तातडीने करत आहे. याशिवाय फ्रेंचायझी आपापल्या खेळाडूंसाठी विविध उपाययोजना करत आहेत. यात फ्रेंचायझींनी खेळाडूंसाठी पीपीई कीट, मास्क, फेस शिल्ड आणि ग्लोज ही दिले आहेत.
हेही वाचा - IPL २०२० : मुंबईसह दोन संघांना हवा 'हा' बांगलादेशी खेळाडू; पण...