दुबई - सनरायजर्स हैदराबादने पंजाबवर ६९ धावांनी मात करत सामना एकतर्फी जिंकला. २०२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पंजाबचा संघ १३२ धावांपर्यंतच मजल मारु शकला. पंजाबकडून निकोलस पूरनने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. परंतू इतर फलंदाजांची साथ न लाभल्यामुळे पंजाबला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला.
कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने पंजाबविरुद्ध सामन्यात २०१ धावांचा डोंगर उभारला. पहिल्या विकेटसाठी वॉर्नर-बेअरस्टो यांनी १५ षटकात १६० धावांची भागीदारी केली. ही जोडी मैदानात असताना हैदराबाद मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. पण रवी बिश्नोईने दोघांना एका षटकात बाद केले. यानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हरमध्ये टिच्चून मारा केला.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरूवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या ६ षटकात बिनबाद ५८ धावा धावफलकावर लावल्या. यादरम्यान, केएल राहुलने शमीच्या गोलंदाजीवर बेअरस्टोचा झेल सोडून त्याला जीवदान दिले. या जीवदानाचा फायदा उचलत बेअरस्टोने ९७ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावले. दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांना धू-धू धुतलं. दोघांनी १६० धावांची सलामी दिली.
रवी बिश्नोईने १६व्या षटकात हैदराबादला दोन धक्के दिले. त्याने पहिल्या चेंडूवर वॉर्नर बाद करत पंजाबला पहिले यश मिळवून दिले. उंच फटका मारण्याच्या नादात उडलेला झेल मॅक्सवेलने टिपला. वॉर्नरने ४० चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ५२ धावा केल्या. यानंतर त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर बेअरस्टोला पायचित करत बिश्नोईने हैदराबाद मोठा धक्का दिला. बेअरस्टोने ५५ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ९७ धावांची वादळी खेळी केली.
पुढील १७ व्या षटकात मनीष पांडे आल्या पाऊले माघारी परतला. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले. पांडेला भोपळाही फोडता आला नाही. अब्दुल समद (८) आणि प्रियम गर्ग (०) ठराविक अंतराने बाद झाले. यानंतर केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा यांनी १० चेंडूत २४ धावा करत हैदराबादला २०० चा टप्पा गाठून दिला. विल्यमसन २० धावांवर नाबाद राहिला. तर अभिषेकने १२ धावा केल्या. रवी बिश्नोईने ३ गडी बाद केले तर अर्शदीप सिंगने दोन तर शमीने एक गडी टिपला.