आबुधाबी - मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकांत 9 बाद 146 पर्यंतच मजल मारू शकला. कोलकाताकडून पॅट कमिन्स याने 12 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह सर्वाधिक 33 धा केल्या. तर कर्णधार दिनेश कार्तिक याने 23 चेंडूत 5 चौकांरांसह 30 धावा केल्या. यासोबत नितीश राणा याने 24, इयन मॉर्गन याने 16 आणि आंद्रे रसेल याने 11 धावा केल्या. कोलकाताच्या पाच खेळाडू तर दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाही.
दरम्यान, गोलंदाजी करताना मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, पैटिनसन, जसप्रीत बुमराह, राहुल चहर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर कायरन पोलार्ड याने एक बळी मिळवला.
तत्पूर्वी, हिटमॅन रोहित शर्माने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्स समोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रोहितने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने ५४ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ८० चोपल्या. त्याला सूर्यकुमार यादवने ४७ धावा करत चांगली साथ दिली. मुंबईच्या फलंदाजांनी आयपीएलमधील महागडा गोलंदाज पॅट कमिन्सची धुलाई केली. मुंबईच्या फलंदाजानी त्याच्या ३ षटकात १६.३० च्या सरासरीने ४९ धावा वसूल केल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरूवात खराब झाली. डावखुरा सलामीवीर क्विंटन डी कॉक दुसऱ्याच षटकात अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्याला शिवम मावीने निखिल नाईककरवी झेलबाद केले. यानंतर रोहित-सुर्यकुमार या जोडीने मुंबईच्या डावाला आकार दिला. दोघांनी मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी केली. पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहितने मारलेला षटकार तर लाजवाब होता. कमिन्सच्या या षटकात १५ धावा वसूल केल्या. दोघांनी सहाव्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. सूर्यकुमार वैयक्तिक ४७ धावांवर धावबाद झाला.
रोहित आणि सौरभ तिवारीने दुसऱ्या गडीसाठी २६ चेंडूत ४९ धावांची भागिदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. यादरम्यान रोहितने १३ व्या हंगामातील पहिले अर्धशतक ३९ चेंडूत पूर्ण केले. नरेनला उंच फटका मारण्याच्या नादात सौरभ तिवारी बाद झाला. त्याचा झेल पॅट कमिन्सने टिपला. सौरभने १३ चेंडूत २१ धावा केल्या. यानंतर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या जोडीने १५ चेंडूत ३० धावा करत संघाला पावणे दोनशेचा टप्पा गाठून दिला. शुभम मावीच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा बाद झाला. त्याचा झेल कमिन्सने टिपला.
रोहितने ५४ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ८० धावा केल्या. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात असणारा हार्दिक पांड्या 'हिट विकेट' झाला. स्वत:ची बॅट स्टंपला लागल्याने त्याला माघारी परतावे लागले. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या. केरॉन पोलॉर्ड आणि कृणाल पांड्या अनुक्रमे १३ आणि १ धावांवर नाबाद राहिले. कोलकाताकडून शिवम मावीने २, तर सुनिल नरेन आणि आंद्रे रसेल यांनी १-१ गडी बाद केला.
मुंबईचा अंतिम संघ -
क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार) सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, केरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
केकेआरचा अंतिम संघ -
सुनिल नरेन, शुभमन गिल, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कर्णधार, यष्टीरक्षक), निखिल नाईक, पॅट कमिंन्स, कुलदीप यादव, संदीप वॉरियर, शिवम मावी.